चांगभलं प्रतिनिधी | कराड
सन २०२६ च्या NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. याबाबत कराड शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष श्री. प्रताप घनश्याम साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, परीक्षा रद्द होणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक आयुष्यावर त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत. अनेक विद्यार्थी गेली दोन ते तीन वर्षे अहोरात्र मेहनत घेत असून, परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांच्या अभ्यासाचा वेग मंदावला आहे. पुन्हा नव्याने त्याच जोमाने तयारी करणे अनेक विद्यार्थ्यांसाठी कठीण ठरत आहे.
तसेच एकदा परीक्षेचा ताण सहन केल्यानंतर पुन्हा त्याच मानसिकतेत जाणे अवघड असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या प्रयत्नात प्रश्नपत्रिकेची कठीणता बदलल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. परीक्षा रद्द झाल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी शहरात जावे लागत असल्याने प्रवास, राहण्याची व्यवस्था, अभ्यास साहित्य यांचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असल्याचे सांगण्यात आले. तसेच परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात प्रामाणिक मेहनतीबद्दल शंका निर्माण होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात व विद्यार्थ्यांच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात नंदकुमार बटाने, सौरभ पाटील, सिद्धार्थ संकपाळ, वेदिका प्रवीण पवार, जयवंत पांडुरंग पाटील, शिवेंद्र सदानंद यादव, अणूज वेर्णेकर, प्रथमेश धोंडीराम पवार, प्रविण पवार, सुहास पवार, रूपाली माने, अख्तर आंबेकरी, प्रमोद वेर्णेकर, अरुणा सुरेश पाटिल, सुनिल मानसिंग पाटील, रोहित कुसूरकर, विशाल संकपाळ, साबीर वाईकर, आशिष मुळे, मंगेश वास्के, सचिन कांबळे, गुलाब शेख, रफिक मुल्ला, अर्जुन पुजारी आणि प्रताप भोसले आदी सहभागी झाले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #NEET #NCPSP #राष्ट्रवादी_शरदचंद्र_पवार_पक्ष
#KaradNews #Karadkar #परीक्षा #नीटपेपरफुटीप्रकरण
#चांगभलंन्यूज #चांगभलं #साप्ताहिकचांगभलं
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या