मागीलपेक्षा मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ; डॉ. भोसले
बाजार समितीत चहापान अन् मतभेद मिटवून भोसले-उंडाळकर एकत्रीकरणाचे संकेत
हैबत आडके | चांगभलं, कराड
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून १८ ते २२ मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तब्बल ५० हजार २५२ मतदार असलेल्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कारखान्याचे संचालक जगदीशदादा जगताप, कराड पंचायत समिती सदस्य पैलवान धनंजय पाटील यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अर्ज दाखल करतेवेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, “यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असून गेली ६५ वर्षे महाराष्ट्रातील आदर्श कारखाना म्हणून त्याची ओळख आहे. गेल्या पाच वर्षांत सभासदांच्या अडचणी सोडवण्यासाठी संचालक मंडळाने सातत्याने प्रयत्न केले. ऊस लवकर तुटून गेला पाहिजे यासाठी कारखान्याचा विस्तार व नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही सभासद मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देतील, उलट यावेळी मताधिक्यात वाढच झालेली दिसेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनीही सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधत पॅनल उभे करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांतील पारदर्शक कारभार, महाराष्ट्रात उच्चांकी दर देणारा कारखाना, वेळेत ऊस वाहतूक आणि विक्रमी गाळप यामुळे सभासदांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पॅनलकडे उमेदवारीसाठी मोठी गर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला संधी देता येत नसली तरी कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली आहे. संधी मिळेल ते निवडणूक लढवतील, उर्वरित कार्यकर्त्यांना अन्य संस्थांमध्ये कुठे ना कुठेतरी नक्की संधी दिली जाणार आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनल ही निवडणूक महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वाधिक मताधिक्याने जिंकेल,” असा दावा त्यांनी केला.
बाजार समितीत चहापान, स्वागत अन् भोसले-उंडाळकर एकत्र समीकरणाचे संकेत
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये गुरुवारी सहकार महर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे मोठे राजकीय शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून डॉ. सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सकाळी ११.५५ वाजता डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारात आगमन झाले. यावेळी कोयना सहकारी बँकेसमोरील स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर दोन्ही नेत्यांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन चहापान केले. कार्यालयात माजी सभापती विजय कदम व संचालक पटेल यांनी त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे स्वागतावेळी पाठीमागे स्व. विलासकाका उंडाळकर यांची प्रतिमा झळकत होती. त्यामुळे या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
कराड दक्षिणमध्ये अनेक वर्षे परस्परविरोधात राहिलेले भोसले आणि उंडाळकर गट आता राजकीय दृष्ट्या कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जवळ येत असल्याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत. दरम्यान, दि. २७ रोजी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत उदयसिंह पाटील-उंडाळकर कोणती घोषणा करतात? उंडाळकर-भोसले एकत्र समीकरणावर काय बोलतात ? याकडे साताऱ्यासह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मात्र आजपासूनच या दोन मोठ्या गटांच्या एकत्र समीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
© Haibat Adake, Karad➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णासाखरकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णानिवडणूक
#कृष्णाकारखानानिवडणूक #सहकारपॅनेल #अतुलबाबाभोसले
#डाॅसुरेशभोसले #रेठरेबुद्रुक #कराड #वाळवा #कडेपूर #कडेगाव
#सांगली #निवडणूक #साप्ताहिकचांगभलं #चांगभलं
#चांगभलंन्यूज #ChangbhalaNews





0 टिप्पण्या