अविनाश मोहितेंचा ‘गलथान कारभारा'वर हल्लाबोल
हैबत आडके | चांगभलं, कराड
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलच्या नेत्या सौ. अर्चनाताई अविनाश मोहिते यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांसह निवडणूक कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज भरले.
रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानातून कराडपर्यंत वाहनांची भव्य रॅली काढण्यात आली होती. घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थकांमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी माध्यमांशी बोलताना कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “संस्थापक पॅनेल पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले असून सभासदांच्या न्याय हक्कासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत. गेल्या अकरा वर्षांत कारखान्यात झालेल्या गलथान कारभाराविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. सरकार आणि निवडणूक यंत्रणेकडून ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक व्हावी, एवढीच अपेक्षा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पॅनेलच्या प्रमुख उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते म्हणाल्या, “आम्ही ही निवडणूक सत्ता किंवा राजकारणासाठी लढवत नाही, तर शेतकरी सभासदांच्या घामाला योग्य दाम मिळावे यासाठी लढवत आहोत. संस्थापक पॅनेलचे सर्व उमेदवार सक्षम असून शेतकरी, सभासदांच्या हिताचा विचार करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, या लढाईत सभासद आम्हाला साथ देतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णानिवडणूक
#संस्थापकपॅनेल #अविनाशमोहिते #सौअर्चनाअविनाशमोहिते
#चांगभलंन्यूज #कराड #वाळवा #कडेगाव #चांगभलं
#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #रेठरेबुद्रुक
#ChangbhalaNews



0 टिप्पण्या