चांगभलं प्रतिनिधी | कराड
रेठरे बुद्रुक (शिवनगर) तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा तर विरोधी कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलच्यावतीने पोपट रंगराव कदम (कामेरी) यांचा, असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तब्बल ५० हजार २५२ इतकी मतदार संख्या असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज पासून (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उपनिबंधक अपर्णा यादव या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून २१ जून ला मतदान तर २३ जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीमुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वातावरण गरमागरम झाले आहे.
पहिल्या दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांनी गट क्रमांक २ काले-कार्वे उत्पादक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे संचालक जगदीशदादा जगताप, कराड पंचायत समितीचे सदस्य पै. धनंजय पाटील आदींसह कारखान्याचे माजी संचालक, सहकार पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभा ठाकलेल्या कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलच्यावतीने गट क्रमांक ४ रेठरे हरणाक्ष-बोरगाव उत्पादक सभासद गटामधून पोपट रंगराव कदम (कामेरी) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी विवेक पाटील, आनंदराव पाटील (कामेरी), स्वप्निल कदम, नागेश कुलकर्णी, सचिन कदम यांच्यासह संस्थापक पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.



0 टिप्पण्या