चांगभलं प्रतिनिधी | कराड
सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित शासकीय प्रश्नांना गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज येथील हॉटेल फर्न येथे ‘सेवा अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे यांनी शिक्षक, पदवीधर आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत विविध प्रश्नांची माहिती जाणून घेतली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना अध्यक्ष शरद लाड , माजी आमदार भगवानराव साळुंखे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, भाजपा पुणे विभाग नोंदणी प्रमुख डॉ. प्रशम कोल्हे, शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव उकिरडे, पुणे विभाग शिक्षक आघाडीचे प्रा. डॉ. नारायण राजूरवार, सातारा शिक्षक आघाडी अध्यक्ष जयवंतराव माने , मुखाध्यापक महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, मुख्याध्यापक संघ कराड माजी अध्यक्ष सुधाकर चव्हाण, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्ष धनाजीराव पाटील, कराड मुखाध्यापक संघ अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, भाजप कराड दक्षिण शिक्षक आघाडी अध्यक्ष सतीश चव्हाण, भाजपा शिक्षक आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सोमदे, विद्यापीठ सिनेट सदस्य अमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक व पदवीधरांच्या शासकीय अडचणी, प्रलंबित कामे तसेच विविध अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक प्रश्नांवर सकारात्मक विचारविनिमय झाला असून संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येईल, असा विश्वास संतोष साखरे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून शिक्षक व पदवीधरांना न्याय मिळवून देणे हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सेवा अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक, पदवीधर आणि भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सातारा जिल्हा महायुतीच्या पाठीशी राहील - आ. डॉ. भोसले
यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. शिक्षकांशी संबंधित अनेक किरकोळ प्रश्न वेळेत सुटावेत तसेच राज्य शासनाच्या पातळीवरील धोरणात्मक प्रश्नांनाही गती मिळावी, यासाठी या बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
सातारा जिल्हा आगामी काळात महायुती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा राहील तसेच शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी जिल्हा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.
याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५ तारखेला सातारा दौऱ्यावर येत असून त्यांच्यासमवेत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या दौऱ्यात अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रत्येकाला पक्के घर’ या संकल्पनेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील घरकुल योजनांच्या तिसऱ्या हप्त्याच्या अनुदान वितरण कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना १५ तारखेला मदत मिळणार असल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#BJPSatara #AtulbabaBhosale #SataraNews
#KaradNews #ChangbhalaNews #चांगभलं




0 टिप्पण्या