🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

एका शिक्षकाचा दारुभट्टी ते ज्ञानभट्टी पर्यंतचा प्रवास... निमित्त गुरुपौर्णिमेचं !

 


एका उपेक्षित आदिम गुन्हेगार ठरविल्या गेलेल्या जातीमधला एक तरुण... पूर्वी दारू काढणं, चोऱ्यामाऱ्या अन् मारामाऱ्या करणं, कधी कधी रखवाली करणं अशा कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या, स्वातंत्र्यापूर्वी गुन्हेगार ठरविल्या गेलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात ज्यांना विमुक्त जाती -जमाती संबोधलं गेलं, अशा उपेक्षित जाती मधला एक तरूण...ज्याने दहावीनंतर सोडून दिलेली शाळा पुन्हा सुरू करत शिक्षणात कमबॅक केला... दारूभट्टी पासून अर्थार्जनासाठीचा त्याचा सुरू झालेला प्रवास थेट ज्ञानभट्टीपर्यंत पोहोचला... गुराख्याचा गुरुजी झाला! त्याच्या तळमळीतून हजारो विद्यार्थी घडविले गेले... अनेक जण शासनाच्या विविध खात्यामध्ये वेगवेगळ्या अधिकारी पदावर आज कार्यरत आहेत. हा प्रवास कसा झाला हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वाचूया त्यांच्याच शब्दात..! - संपादक


गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझे मार्गदर्शक गुरु रामभाऊ सातपुते यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन लावला आणि रामभाऊंच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला की "आम्हाला ही अभिमान आहे तुमच्यासारख्या विद्यार्थी घडवणाऱ्या गुरूंचा, ज्यांचा दारूभट्टीपासून सुरू झालेला प्रवास आज ज्ञानभट्टीपर्यंत पोहोचलेला आहे."...आणि मन भूतकाळात गेलं आणि सर्व काही आठवणीत येवू लागलं. अकरावी आर्ट्सचा विद्यार्थी कॉलेज सुटलं की पळत घरी जातो आणि सायकल घेऊन किल्लेमच्छिंद्र गडाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो आणि सायकलवरती दारूच्या गुळाची पोती टाकून भितभीत रस्त्यावर सारखं मागे पुढे पाहत प्रवास करतो. अन एकदा का कारखान्याच्या सोसायटीच्या पाठीमागील बाजूस पोहोचला की सुटकेचा निश्वास टाकतो आणि नंतर संध्याकाळी त्याच सायकलवरून भट्टीसाठी लागणारी जळणाची लाकडं आणायला पुन्हा प्रवास. हा रोजचा दिनक्रम. पण एवढं सगळं घडत असताना कधी कधी रस्त्यावरून ये-जा करताना आमच्याच दारूच्या भट्टीवरून दारू पिऊन त्याच्या घरात जाऊन दंगा करणारा दारुडा पाहिला की खूप वाईट वाटून जायचं. 'आपल्या हातून काहीतरी वाईट घडतंय' असं वाटायचं पण परिस्थितीमुळे अर्थार्जनासाठी त्या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या.

हे सर्व काही घडत असताना आपणही कधीतरी शिक्षक होऊ आणि कोणाचं तरी आयुष्य घडवू या गोष्टीचा मनाला कधी स्पर्श सुद्धा केला नाही, पण का कोणास ठाऊक चांगले मित्र आणि चांगल्या गुरूंच्या सानिध्यात आलो आणि मी वेगळाच घडलो. आमची जात रामोशी. ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेली. आणि स्वातंत्र्यानंतर विमुक्त प्रवर्गात समाविष्ट असलेली. पंधरा-वीस वर्षांपूर्वी शिक्षणाचे प्रमाण तुरळत म्हणजे अगदी नगण्यच होतं. दहावीपर्यंत पोरगं शाळा शिकलं की आणि पोरगी चौथीपर्यंत पोचली तरी खूप शिकल्यासारखं भावकीला आणि पै-पाहुण्यांना वाटायचं. एवढं शिक्षण म्हणजे खूपच, आता आपली पारंपारिक काम पोरांनी करावी, असा सर्वांचा आग्रह असायचा. त्यामुळे पोरगं दहावीच्या वर्गात पास किंवा नापास झालं तरी तिथून शाळेला कायमचा ब्रेक मिळायचा. मी सुद्धा कशीबशी दहावी पूर्ण केली आणि दिली शाळा सोडून ! कारण पुढचं भविष्य काहीच समजत नव्हतं. पण माझ्या आईला मात्र पुढचं कळत असावं, तिचा आत्मविश्वास तेवढा असावा, की ज्यामुळे शाळा सोडून दिलेल्या आपल्या पोराला तिने शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितलं. शाळा सोडून दिलेल्या मला माझ्या आईनं परत एकदा कॉलेजचा रस्ता दाखवला आणि तिला सतत वाटायचं की माझं पोरगं हुशार आहे. तो नक्कीच काहीतरी करून दाखवेल, तिच्यामुळे त्यावेळी माझा शिक्षणात कमबॅक झाला. म्हणूनच आईला मी सगळ्यात जवळचा गुरु मानतो!

पुढे कॉलेजमध्ये आल्यानंतर ज्या गुरूंना माझ्यातला 'खेळाडू' दिसला ते डॉ.प्रा.संजय पाटील सर. आणि ज्यांना माझ्यातला 'कलाकार' दिसला ते गवळी सर. आणि ज्यांनी मला 'घडवण्यासाठी' सतत मार्गदर्शन केलं त्या डॉ.प्रा. राजहंस मॅडम, प्रा. भाकरे सर, गायकवाड सर, गोमटेश्वर पाटील सर आणि आता सतत मार्गदर्शन करणारे डॉ. विशाल साळुंखे सर या सर्व गुरूंचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. आज मी कृष्ण महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथे शारीरिक शिक्षण विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतोय. पण आज विचार केला तर मी सेटल आहे की नाही हा विषय माझ्यासाठी गौण आहे. पण अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य सेटल करू शकलो, याचं समाधान मला जगण्याचा आनंद देऊन जातं आहे. गेली 18 वर्षे झाली पोलीस भरती व आर्मी भरती याचं प्रशिक्षण देऊन 50 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात, 4 पी.एस.आय. परीक्षेत यशस्वी आणि 30 पेक्षा अधिक विद्यार्थी सैन्यत भरती झाले आहेत. महत्वाचे म्हणजे हे सर्व प्रशिक्षण देताना कुणाचाही एक रुपयाही घेतला नाही. त्यामुळेच त्यांच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी माझे प्रयत्न यशस्वी ठरले, याचा सार्थ अभिमान आहे. ज्या दारूच्या भट्टी वरती काम करताना पोलिसांना भ्यायचो, तोच माणूस आता पोलीस दलासाठीचा पोलीस जवान तयार करतोय, याच्या सारखं सुख दुसरं कोणतं असू शकतं! 

या सर्व प्रवासात माझी बायको सुद्धा माझा गुरु म्हणून माझ्या पाठीशी सदैव उभी राहिली. पण खंत एवढीच आहे की माणसं आजही विचारतात की, 'सर तुम्हाला किती पगार आहे'. त्यावेळी मनाला खूप वाईट वाटतं पण मनापासून सांगावसं वाटतं की अरे मी जास्त पैसे घेणाऱ्या शिक्षकांच्या बरोबरीने काम करून मुलं घडवायचा प्रयत्न केलाय आणखी काय पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात सुख मानायचा प्रयत्न केला. पण कधी कधी मुलाबाळांसाठी जास्त पैसा कमावला पाहिजे असं वाटतं पण मनात येते की जर पैशाच्या मागे लागलो तर माझ्यातला एक चांगला शिक्षक संपेल. म्हणून येईल त्या परिस्थितीत लढायला तयार असतो. ठामपणे, एक चांगला विद्यार्थी घडवणे हाच माझा उद्देश राहिला आणि शेवटपर्यंत राहील कारण मी जे भोगलं ते माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येऊ नये हीच अपेक्षा ठेवून काम करत राहतो, मग कोणी वाईट समजू दे अथवा चांगलं. पण माझ्या नशिबाने मला सदैव चांगले गुरु लाभले.त्यामुळे मी सदैव सुखी आहे. 

या सर्व प्रवासात शिक्षणमहर्षी स्व.जयवंतराव भोसले ( आप्पासाहेब ) यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील डॉ.सुरेशबाबा भोसले., आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आणि विनायक भोसले ( विनूबाबा ) यांचाही माझ्या आयुष्याला खूप मोठा हातभार लागला. यांच्यासारख्या ज्ञानी गुरूंची साथ लाभली नसती तर एक दारूची भट्टी सांभाळणारं पोरगं कधी शिक्षक होऊ शकलं नसतं. त्यामुळे भोसले कुटुंबाच्या ऋणात सदैव राहणं हेच आपलं परम कर्तव्य समजतो. पण ज्या समाजात राहतो तिथला प्रत्येक विद्यार्थी चांगला घडला पाहिजे आणि तो घडवताना माझा थोडाफार हातभार लागला पाहिजे आणि त्यांचं कुटुंब व्यसनाधीनता, अज्ञान, दारिद्र्य यातून मुक्त व्हावं हीच भावना ठेवून माझे काम चालू आहे आणि ते शेवटपर्यंत चालू राहण्यासाठी मला अशा चांगल्या गुरूंची साथ सदैव लाभत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या ज्ञानमय शुभेच्छा

--- प्रा. अमोल मोहन मंडले.
कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक.

( भ्रमणध्वनी - 7499047767).

➖➖➖➖➖➖➖➖

#गुरुपौर्णिमा #शिक्षक #गुरुजी #प्रेरणादायीस्टोरी #सत्यकथा 

#reallife #positivestory #रामोशी #प्राध्यापक #दारूभट्टी

#ज्ञानभट्टी #स्पर्धापरीक्षा #कृष्णामहाविद्यालय #रेठरेबुद्रुक

#किल्लेमच्छिंद्रगड #बेरडमाची #डाॅसुरेशभोसले #आमदारअतुलबाबाभोसले #विनायकभोसले #कृष्णाकारखाना

#शारिरिकशिक्षण #मेहनतीशिक्षक #चांगभलं #चांगभलंन्यूज

#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूजपेपर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या