🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

विश्वासाची पुनर्स्थापना...! साताऱ्यातील पोलीसिंगच्या नव्या पर्वाची शंभर दिवसांची कहाणी



"राजा धर्मेण भूमिं रक्षेत" --- राज्यकारभाराचा मूलमंत्र सांगणारे हे वचन आजही तितकेच समर्पक आहे. शासन व्यवस्था सक्षम असण्यासाठी प्रशासन निष्पक्ष असणे आवश्यक आहे आणि त्या प्रशासनाचा सर्वात दृश्यमान चेहरा म्हणजे पोलीस यंत्रणा. कायद्याचा धाक आणि नागरिकांचा विश्वास या दोन स्तंभांवर लोकशाही उभी असते. यांपैकी एक जरी डळमळीत झाला, तरी समाजात अस्वस्थता निर्माण होण्यास वेळ लागत नाही.
संत तुकाराम महाराज म्हणतात---
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता."
पोलीस प्रशासनासाठीही हीच भूमिका आदर्श ठरते. बहुमत, दबाव, प्रभाव किंवा राजकीय समीकरणांपेक्षा कायदा आणि सत्य यांनाच सर्वोच्च स्थान देणारी व्यवस्था नागरिकांना अपेक्षित असते.
एप्रिल २०२६ मध्ये सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन राज्यभर चर्चेचा विषय बनले होते. जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडी, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि पोलिसांच्या भूमिकेवरून सुरू झालेला वाद यामुळे पोलीस दलासमोर विश्वास पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. अशा संवेदनशील वातावरणात २२ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारली. त्या वेळी त्यांच्यासमोर केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान नव्हते; तर पोलीस दलाबद्दल निर्माण झालेला संभ्रम दूर करून नागरिकांचा विश्वास पुन्हा जिंकण्याची जबाबदारीही होती.
शंभर दिवस हा कालावधी एखाद्या अधिकाऱ्याच्या संपूर्ण कार्यकाळाचे मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा नसतो. मात्र दिशा निश्चित करण्यासाठी तो नक्कीच महत्त्वाचा आहे. गेल्या शंभर दिवसांकडे पाहताना सातारा पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका, कामकाजात तंत्रज्ञानाचा वाढवलेला वापर, जनतेशी वाढवलेला संवाद आणि कायद्याच्या अंमलबजावणीत दिसून आलेली निष्पक्षता या बाबी विशेषत्वाने अधोरेखित कराव्याच लागतील.
अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाया, गुंडगिरीला घातलेला आळा, बेकायदा शस्त्र तस्करीच्या विरोधातील मोहीमा आणि संघटित गुन्हेगारीवर ठेवलेली प्रभावी नजर, यामुळे जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत झाली आहे. गुन्हेगारांच्या मनात भीती आणि सामान्य माणसाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली, तरच पोलीस यंत्रणेचे कार्य यशस्वी ठरते. अनेकदा असे म्हटले जाते की,
"गुन्हेगाराला पोलीसांची भीती वाटत नाही; त्याला निष्पक्ष पोलीसांची भीती वाटते."
यामागे मोठा अर्थ दडला आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, ही भावना रुजली की गुन्हेगाराचा आत्मविश्वास कमी होतो आणि नागरिकांचा विश्वास वाढतो.
"व्यसन एकाचे... पण उद्ध्वस्त होतात अनेक संसार."
समाजाला पोखरणाऱ्या अंमली पदार्थांविरोधात सातारा पोलिसांनी अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठोस भूमिका घेतली. ६४.१३ लाख रुपये किंमतीचा तब्बल ५०९ किलो गांजा, गांजाची झाडे ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कराड येथील जैव कचरा निर्मूलन प्रकल्पात नष्ट करण्यात आली. ही कारवाई केवळ आकडेवारी नसून युवकांना व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्धाराचे प्रतीक ठरली आहे.
आज गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी रस्त्यावर दिसणारा गुन्हेगार आता इंटरनेटच्या पडद्यामागे लपलेला असतो. आता बंदुकीपेक्षा लॅपटॉप अधिक घातक ठरत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा काळाची गरज बनला आहे. सातारा पोलिसांनी ही गरज ओळखून सायबर तपासात वेगळी छाप सोडली आहे. कोरेगाव तालुक्यात सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश करून अमेरिकन नागरिकांना Amazon Order', 'Digital Arrest' आणि 'Gift Voucher'च्या नावाखाली फसवणाऱ्या या रॅकेटमधील १७ पुरुष आणि ४ महिलांसह एकूण २१ आरोपींना अटक केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि नियोजनबद्ध कारवाई यांचा हा उत्तम संगम ठरला.

दुसरीकडे , लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पालखी सोहळ्यात पोलिसांसाठी सुरक्षा व्यवस्था राखण्याची मोठी परीक्षा असते. मात्र ड्रोनद्वारे हवाई निरीक्षण, सीसीटीव्ही नियंत्रण, वाहतूक नियोजन, संवेदनशील ठिकाणांवरील विशेष बंदोबस्त आणि समन्वयित पोलीस यंत्रणा यांच्या मदतीने सातारा पोलिसांनी मोठ्या गर्दीतही कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखली. पारंपरिक बंदोबस्ताला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा अधिक उंचावल्याचे दिसून आले. अनेक वारकऱ्यांनीही सातारा पोलीस प्रशासनाच्या या सुरक्षा व्यवस्थापनाचे आवर्जून कौतुक केले.

"कायदा केवळ गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी नसतो; तो निरपराध माणसाला निर्भयपणे जगता यावे म्हणून असतो."
ही भावना प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या कृतीतून दिसली, तरच लोकशाही अधिक बळकट होते.
"जो युवा किताबों से दोस्ती करता है,
उसे अपराध की गलियाँ कभी आकर्षित नहीं करतीं..."
समाज गुन्हेगारी पासून मुक्त राहावा यासाठी कठोर कारवाईसोबतच पोलिसांनी सामाजिक उत्तरदायित्व जपणेही तितकेच महत्त्वाचे असते.
निखिल पिंगळे यांच्या कार्यपद्धतीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सामाजिक जाण.
स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या उद्घाटनासारख्या कार्यक्रमांतून त्यांनी तरुणांना शिक्षण, करिअर आणि राष्ट्रनिर्मितीकडे वळण्याचे आवाहन केले. गुन्हेगारीवर कठोर कारवाई आणि समाजाशी जिव्हाळ्याचा संवाद या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे हीच आधुनिक पोलीस नेतृत्वाची खरी ओळख आहे.
हिंदीतील एक ओळ येथे समर्पक वाटते ,
"न्याय वही, जो सबके लिए एक समान हो;
वरना ताकतवर की जीत और कमजोर की हार, न्याय नहीं कहलाती."
पोलीस यंत्रणा कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक प्रभावापासून दूर राहून कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण झाला, तर त्यापेक्षा मोठे यश कोणतेच असू शकत नाही.
प्रशासनाचे मूल्यमापन टाळ्यांनी होत नाही; ते नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासानेच होते. गेल्या शंभर दिवसांत साताऱ्यातील पोलीसिंगबाबत अशी विश्वासाची नवी पायाभरणी झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे. अर्थात, हा अंतिम टप्पा नाही.
मात्र शंभर दिवसांच्या या काळात केलेल्या कामगिरीने सातारा पोलीस दलाबद्दल जिल्ह्यातील जनतेच्या मनात सकारात्मक अपेक्षा निर्माण केल्या आहेत. हे खरे असले तरी, प्रत्येक यशासोबत जबाबदारीही वाढत असते. गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, सायबर गुन्ह्यांची वाढ, अंमली पदार्थांचे जाळे आणि सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी या सर्व आव्हानांना पुढील काळातही अधीक्षक निखिल पिंगळे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा पोलीस दलाला तितक्याच सक्षमपणे सामोरे जावे लागणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे,
"जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो."
समाजात कायद्याचा सन्मान वाढावा, गुन्हेगारीला आळा बसावा आणि नागरिकांच्या मनातील विश्वास अधिक दृढ व्हावा, हीच अपेक्षा! सातारा पोलीस दलाच्या नव्या अधीक्षकांच्या या शंभर दिवसांच्या वाटचालीकडे त्या दृष्टीने आशादायी सुरुवात म्हणून पहायला हरकत नाही. पुढील प्रवासातही हीच दिशा कायम राहिली, तर "विश्वासाची पुनर्स्थापना" हा केवळ मथळा न राहता सातारा पोलीस प्रशासनाची बदलत्या काळातील नवी ओळख ठरू शकेल ! साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याबद्दल तूर्तास एवढेच,
"वक़्त गवाह रहेगा कि इरादे कैसे थे,
राह मुश्किल थी मगर क़दम ठहरे नहीं।
सौ दिन तो बस एक पड़ाव है सफ़र का,
अभी कई इम्तिहान हैं... और कई मंज़िलें बाकी हैं।"
 लगे रहो !!!

- हैबत आडके, संपादक - चांगभलं

(नोंद - या लेखासाठी आम्ही Pandharpurlivenews.com या संकेतस्थळावरील लेखाचा तसेच सोशल मीडियावरील अन्य काही ठिकाणच्या लेखांचा / बातम्यांचा संदर्भ घेतला आहे.)


➖➖➖➖➖➖➖➖➖

#SataraPolice #NikhilPingle #100Days #Satara #MaharashtraPolice #PoliceLeadership #LawAndOrder #PublicTrust #CrimeControl #CyberCrime #DrugFreeMaharashtra #TransparentGovernance #GoodGovernance #SataraNews #MarathiNews #Maharashtra #Police #Leadership #ChangbhalaNews #कराड #सातारा #सातारापोलीस #महाराष्ट्रपोलीस #निखिलपिंगळे #१००दिवस #गुन्हेगारी #लोकाभिमुखपोलीसिंग #पारदर्शकप्रशासन #चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या