चांगभलं प्रतिनिधी | कराड
शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या पक्षाची स्थापना झाली तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, असे प्रतिपादन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष भाई ऍड. समीर देसाई यांनी केले.
पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात कराड येथील मध्यवर्ती कार्यालयात ते बोलत होते.
देसाई म्हणाले की, पक्षाला ज्वलंत व क्रांतिकारी इतिहास आहे, शेतकरी कष्टकरी वंचित बहुजन कामगार तसेच दिनदुबळे यांच्या हक्कासाठी लढणारा हा बुलंद आवाज असणारा हा पक्ष आहे. गेली 79 वर्षे झाली, शेतकऱ्यांच्या घामाची, कष्टकऱ्यांच्या संघर्षाची लालबावट्याची निष्ठेची निशाणी असणारा हा पक्ष आहे.
स्वातंत्र्याची पहाट उगवत आहे असे दिसल्यावर 1947 रोजी काँग्रेस मधील काही लोक त्यांच्या मनात विचार आला की, कष्टकरी कामगार व शेतकऱ्यांसाठी आता वेगळा विचार केला पाहिजे, त्यामुळे २ व ३ ऑगस्ट 1947 रोजी आळंदी येथे, शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली. "देशात ब्रिटिशांच्या हातून मिळणारी सत्ता शेतकरी आणि कामगारांच्या श्रमावर ऐतोबाप्रमाणे जगणाऱ्या, भांडवलशाहीच्या हातात जाऊ नये", म्हणून संघटित प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे, त्या दृष्टीने बहुजन समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटनेला स्वतंत्र अशा पक्षाची गरज आहे, असा ठराव पारित करून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली होती.
त्यावेळी केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील, भाऊसाहेब राऊत, शंकरराव मोरे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत त्या ठिकाणी उपस्थित होते. शेतकरी व कामगार यांच्याशी समरस होऊन क्रांतिकारक हेतूने विधायक कार्यक्रम हाती घ्यावेत, असा त्यावेळी ठराव करण्यात आला, असा इतिहास भाई ऍड. समीर देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितला.
समीर देसाई त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, बदलत्या काळानुसार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात युवक युवतींना संधी देण्यात येणार आहे. तसेच तरुणांनी शेतकरी कामगार पक्षात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहनही ऍड. देसाई यांनी केले.
या कार्यक्रमास भाई एम. आर. जाधव, भाई दिनकरराव गुरव, कराड पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांची विशेष उपस्थिती होती. ऍड. हैबतराव पवार, ऍड. अमित लाड, भाई अरुण डुबल, विद्याधर गायकवाड, संभाजी जाधव, महेश जिरंगे, महेश जमाले, युवराज मस्के, संदीप तिकवडे, प्रल्हाद माने व पक्षाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖
#शेकाप #शेतकरीकामगारपक्ष #समीरदेसाई #कराड #चांगभलं
#चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूजपेपर

0 टिप्पण्या