कोयना नदीत एकूण 30,223 क्युसेक विसर्ग सुरू
चांगभलं प्रतिनिधी | कोयनानगर | दि. २ ऑगस्ट २०२६
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून, रविवार (२ ऑगस्ट) सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत धरणात ९१.४२ टीएमसी (८६.८६ टक्के) इतका एकूण पाणीसाठा झाला आहे. तर उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा ८६.३० टीएमसी (८६.१९ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणाची पाणीपातळी २१५२ फूट ९ इंच (६५६.१५८ मीटर) इतकी असून, धरणात ३८,३८७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
दरम्यान, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (२ ऑगस्ट) सायंकाळी ६.०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ६ फुटांवरून ५ फुटांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून २९,१७३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
सध्या कोयना पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीपात्रात एकूण ३०,२२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.
यापूर्वी सायंकाळी ५ वाजता धरणातून ३२,७७६ क्युसेक (रेडियल गेट) आणि १,०५० क्युसेक (केडीपीएच) असा एकूण ३३,८२६ क्युसेक विसर्ग सुरू होता. दरवाजे ५ फुटांपर्यंत खाली आणल्यानंतर हा विसर्ग कमी होऊन ३०,२२३ क्युसेक इतका राहणार आहे.
पर्जन्यमान
कोयना : २० मिमी (एकूण ३,१५५ मिमी)
नवजा : ३२ मिमी (एकूण ३,८०१ मिमी)
महाबळेश्वर : २३ मिमी (एकूण ३,९५३ मिमी)
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
कोयना सिंचन विभागाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील गावांच्या ग्रामप्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी केले आहे.
तसेच, पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन सांडव्यातील विसर्गात आवश्यकतेनुसार पुन्हा वाढ केली जाऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
➖➖➖➖➖➖➖
#कोयनाधरण #कोयनाविसर्ग #चांगभलंन्यूज #चांगभलं

0 टिप्पण्या