माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून शोक व्यक्त
चांगभलं प्रतिनिधी | कोल्हापूर | ४ ऑगस्ट २०२६
देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी (४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. त्यांच्या निधनामुळे राज्यासह देशभरातील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे वडील होते. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर विविध पक्षांचे नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिक्षण क्षेत्रात उभारले भक्कम साम्राज्य...
अत्यंत सामान्य परिस्थितीतून प्रवास सुरू करत डॉ. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या डी. वाय. पाटील समूहाने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत शिक्षणाचा विस्तार केला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आणि इतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
उच्च शिक्षणाची संधी ग्रामीण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांच्या कार्याचा मोठा वाटा मानला जातो. आज त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून देशभरात शेकडो अभ्यासक्रम आणि अनेक विद्यापीठे कार्यरत आहेत.
सार्वजनिक जीवनातील महत्त्वपूर्ण योगदान
शैक्षणिक कार्याबरोबरच डॉ. पाटील यांनी सार्वजनिक जीवनातही उल्लेखनीय भूमिका बजावली. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राज्याच्या राजकारणापर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर त्यांची त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. तसेच काही काळ त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला.
प्रशासकीय अनुभव, संयमी स्वभाव आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन यामुळे त्यांना सर्वपक्षीय नेत्यांचा आदर लाभला होता.
'पद्मश्री'ने झाला गौरव
शिक्षण, समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' या प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन समाजाभिमुख कार्याचा गौरव मानला जातो.
शोकभावनांची लाट
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करण्याचा त्यांचा ध्यास, संस्थाबांधणीची दृष्टी आणि समाजाभिमुख कार्य यामुळे त्यांचे नाव कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्रासाठी मोठी हानी ! - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
"पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले योगदान कायम स्मरणात राहील. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ते खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते. त्यांच्याशी आमच्या कुटुंबाचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने वैयक्तिकरीत्याही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सतेज पाटील, संजय पाटील तसेच संपूर्ण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
— पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
➖➖➖➖➖➖➖➖

0 टिप्पण्या