चांगभलं प्रतिनिधी | कराड
शिवनगर, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या हंगामातील तांत्रिक कार्यक्षमतेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी कारखान्याला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कार्यक्षमता पुरस्कार २०२४-२५ अंतर्गत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा यशस्वी कामगिरीची मोहोर उमटवली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने आज हा पुरस्कार जाहीर केला. कारखान्याने सादर केलेल्या कामगिरीच्या माहितीचे मूल्यांकन केल्यानंतर, भारत सरकारच्या साखर विभागाच्या मुख्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या पुरस्कार निवड समितीने २०२४-२५ च्या कार्यक्षमतेचे अंतिम निकाल निश्चित केले आहेत. त्यामध्ये कृष्णा कारखान्याला “उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, २०२४-२५ चा हंगाम आव्हानात्मक असतानाही कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय ठरल्याचे महासंघाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे तांत्रिक कार्यक्षमता आणि उच्च साखर उतारा क्षेत्रातील कारखान्याच्या कामगिरीला मिळालेला हा पुरस्कार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या पुरस्काराचे वितरण मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कृष्णा कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖
#कृष्णासाखरकारखाना #सुरेशबाबाभोसले #रेठरेबुद्रुक #सहकार

0 टिप्पण्या