जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात
चांगभलं प्रतिनिधी | कराड
आजच्या काळात केवळ अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे एवढेच पुरेसे नसून रासायनिक अवशेषमुक्त आणि शाश्वत शेतीचा विस्तार करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात करताना 'अन्नसुरक्षा' आणि 'आरोग्यसुरक्षा' या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवावी. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणारे दूत आणि निरोगी भारताचे निर्माते बनावे, असे आवाहन 'रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी केले.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. संचालक संग्राम पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्राचार्य डॉ.अशोक फरांदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी शेती आणि आरोग्याच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे मातीची सुपीकता नष्ट होत असून, अन्नधान्यात रासायनिक अवशेष वाढल्याने कर्करोग सारख्या गंभीर समस्या वाढत आहेत. हे चित्र बदलण्याची खरी जबाबदारी आता नव्याने प्रवेश घेतलेल्या या तरुण विद्यार्थ्यांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्ण सेंद्रिय शेती करण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात 'रेसिड्यू फ्री' शेतीचा अवलंब करून शेतमाल निर्यातक्षम बनवावा. तसेच सेंद्रिय कर्ब आणि जैविक खतांचा वापर करून मातीचे आरोग्य जपावे, कारण माती जिवंत असेल तरच शेतकरी समृद्ध होईल. यासोबतच शेतमालाचे प्रमाणीकरण करून बाजारात विश्वासार्ह ब्रँड निर्माण करण्यास शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाताना स्वामी विवेकानंदांच्या विचारांनुसार संयम, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता सातत्याने ज्ञानाचा विस्तार करावा. जन्मजात मिळणारे ज्ञान, पदवी आणि अभ्यासातून संपादन केलेले ज्ञान, प्रेरणेतून मिळणारे ज्ञान आणि संतांना प्राप्त झालेले अलौकिक ज्ञान याविषयी सांगताना त्यांनी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा दाखला दिला. कृषी शाखेच्या शिक्षणामुळे जन्मदाती माता, काळी आई आणि गोमाता या तिन्हींची सेवा करण्याची अद्वितीय संधी विद्यार्थ्यांना मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संचालक संग्राम पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.अजित पवार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. आर.डी. पवार यांनी दीक्षारंभ कार्यक्रमाचा आढावा घेतला. जी.के. मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सारंग कुंभार यांनी आभार मानले.
➖➖➖➖➖➖

0 टिप्पण्या