चांगभलं प्रतिनिधी | कराड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑक्टोबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी या कार्डचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांनी वेळेत एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक विक्रम हांडे व डेपो मॅनेजर शर्मिष्ठा पोळ यांनी केले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार विविध प्रवर्गातील प्रवाशांना एसटीकडून सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. ही सवलत अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे. यापुढे सवलतीचे तिकीट देताना कार्डचा वापर केला जाणार आहे. राज्यातील एसटी आगार व बसस्थानकांवर कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीच कार्यरत असलेल्या एनसीएमसी कार्डधारकांना त्याच कार्डचा वापर करता येईल. नव्याने नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना क्यूआर कोड असलेली पावती देण्यात येणार असून, त्याआधारे ३० दिवसांपर्यंत सवलतीचा लाभ घेता येणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड कार्यरत करून त्यामध्ये आवश्यक रक्कम टॉपअप करणे आवश्यक आहे.
कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी भीम अॅप तसेच कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल पद्धतीने टॉप अप करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीच्या तिकिटासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी कराड आगार किंवा बसस्थानकात जाऊन लवकरात लवकर कार्ड नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक विक्रम हांडे व डेपो मॅनेजर शर्मिष्ठा पोळ यांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖
#कराडबसस्थानक #एनसीएमसीकार्ड #लालपरी #एसटीचाप्रवास #चांगभलंन्यूजपेपर #कराडआगार #ChangbhalaNews

0 टिप्पण्या