कराड, दि. २२ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक कराड येथील बहुउद्देशीय हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे आणि सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील यांनी उमेदवार आणि प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी मांडलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले की, या निवडणुकीसाठी एकूण 74 मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रासाठी मतदान यंत्रांसह 20 टक्के यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. तेवढेच कर्मचारी व 20 टक्के अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण 19 नोव्हेंबर रोजी झाले असून दुसरे प्रशिक्षण 24 नोव्हेंबर व तिसरे प्रशिक्षण 1 डिसेंबर रोजी होणार आहे.
या बैठकीत मतदार यादी, दुबार मतदार, मयत मतदार, मृत्यूचे दाखले प्राप्त झालेले व न झालेले मतदार, स्थलांतरित व तात्पुरते स्थलांतर झालेले मतदार अशा विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. केंद्र निहाय मतदार यादीची प्रत, शिक्के, दुबार व मयत मतदारांचे ASD लिस्ट याबाबतही माहिती देण्यात आली.
प्राप्त मतदान यंत्रांची यादी उपस्थित पक्षांना देण्यात आली. मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी, सरमिसळ प्रक्रिया, मतदान यंत्र तयार करणे, साहित्य देणे–घेणे यासंबंधी सर्व माहिती उमेदवारांना देण्यात आली.
या निवडणुकीच्या देखरेखीसाठी 15 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांनी करावयाच्या खर्चावर लक्ष, उमेदवार प्रतिनिधी व निवडणूक प्रतिनिधी नियुक्ती, मतदान केंद्रनिहाय पोलिंग एजंट आणि मतमोजणी प्रतिनिधी नियुक्ती यासंदर्भातही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शक ठेवण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असून सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन शेवटी करण्यात आले.
#Karad #KaradNews #ChangbhalaNews #KaradMunicipalElection #Election2025 #MaharashtraElections #KaradNagarParishad #SVEEP #KaradUpdates #AtulMhetre #YuvrajPatil #MunicipalCouncilElection

0 टिप्पण्या