कराड, दि.२२ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप पथकाच्यावतीने कराड येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यशवंत हायस्कूलच्या मैदानावर तब्बल 500 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून ‘VOTE’ हे अक्षर साकारत नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले.
या उपक्रमाची संकल्पना मुख्याध्यापक सुनील महामुलकर यांनी मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून हा उपक्रम यशस्वी केला. मानवी साखळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमानिमित्त मतदान जागृती रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत नागरिकांना “मतदान करा, लोकशाही बळकट करा” असा संदेश दिला.
कार्यक्रमाला स्वीप पथकाचे सुनील परीट, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंदराव जानुगडे यांनी विद्यार्थ्यांकडून मतदान जागृतीची प्रतिज्ञा घेतली. तर सुनील परीट यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “घरी जाऊन आई-वडिलांना मतदान करण्यास सांगा आणि तुम्हीही भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून मतदान करा.”
या विशेष उपक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील महामुलकर यांनी केले. त्यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानत सांगितले की, लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि विद्यार्थ्यांनी यातून दिलेला संदेश निश्चितच समाजाला दिशा देणारा आहे.
मानवी साखळी, ‘VOTE’ अक्षरांची रचना आणि रॅलीमुळे कराड शहरात मतदान जागृतीचा प्रभावी संदेश पोहोचला.
#Karad #KaradNews #ChangbhalaNews #VotingAwareness #SVEEP #VoteKarad #YashwantHighschool #StudentInitiative #MunicipalElection #VoteForIndia #MahaElection2025 #KaradMunicipalCouncil #KaradUpdates


0 टिप्पण्या