मलकापूर - कराड | चांगभलं वृत्तसेवा
मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आज महत्त्वाचा घडामोडींचा दिवस ठरला. प्रभाग क्रमांक 8अ मधील उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरवल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपीलवर न्यायालयाने उमेदवार गीता नंदकुमार साठे यांच्या बाजूने निर्णय देत त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यांना थेट भाजपने उमेदवारी दिली. तर जिल्हा व सत्र न्यायालयाने उमेदवारी अर्ज वैध ठरवल्यानंतरही प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने 4 अ मध्ये भाजपचे सुनील खैरे बिनविरोध राहिले.
याबाबतची अधिक माहिती अशी, गीता साठे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्यानंतर त्यांनी कराडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात त्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत सुनावणी होऊन न्यायालयाने 24 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार त्यांची उमेदवारी वैध ठरवली. त्यामुळे अधिकृतपणे निवडणूक रिंगणात कायम राहिल्या.
दरम्यान, प्रभाग 8अ मधील भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी मिळालेल्या स्वाती समीर तुपे यांनी आपला उमेदवारी अर्ज 25 नोव्हेंबर रोजी मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपने आता गीता नंदकुमार साठे यांना अधिकृत उमेदवारी दिली.
तर प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये देखील न्यायालयीन निर्णयामुळे घडामोडी रंगल्या. सचिन संपत खैरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्यानंतर त्यांनी अपील जिल्हा सत्र न्यायालय, कराड येथे दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन 24 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायालयाने त्यांची उमेदवारी वैध ठरवली. मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःहून 25 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अगोदर त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुनील प्रल्हाद खैरे हे प्रभाग 4अ मधून बिनविरोध झाले होते, आता प्रतिस्पर्धी सचिन खैरे यांनी आपला स्वतःहून अर्ज मागे घेतल्याने सुनील खैरे यांची बिनविरोध निवड कायम राहिली.
अपक्षांना उद्या होणार निवडणूक चिन्हांचे वाटप...
दरम्यान, उद्या बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता अपक्ष उमेदवारांना अधिकृतपणे निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
#MalkapurNagarParishad #MalkapurElection2025 #KaradNews #SataraNews
#BJP #GeetaSathe #SachinKhaire #SunilKhaire #Election2025
#ChangbhalaNews #LocalElections #MunicipalElection #KaradUpdates

0 टिप्पण्या