मलकापूर, दि. १२ नोव्हेंबर २०२५ | हैबत आडके
मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहे. या निर्णयामुळे एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीला आता नव्या राजकीय समीकरणांची जोड मिळणार असून चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूला करून निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर समविचारी पक्षांसोबत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मलकापूरमधील राजकारणात नवा टर्न निर्माण झाला मलकापूरच्या राजकीय आखाड्याचे तापमान आता वाढत जाणार, हे निश्चित झालं आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीस राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील वाठारकर, राष्ट्रवादी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, कराड दक्षिण राष्ट्रवादी महिला अध्यक्षा दिपिका जाधव, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष महादेव शिंदे, प्रा. धनाजीराव काटकर, नितीन थोरात, सविनय कांबळे, माजी नगरसेवक सागर जाधव, अमर इंगवले, जयंत कुराडे, किशोर येडगे, पंडित शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत रणनीती, उमेदवार निवड प्रक्रिया, आणि स्थानिक पातळीवरील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली. समविचारी पक्षांसोबत लढण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभावी ताकद दाखविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मलकापूरमधील ही राजकीय हालचाल फक्त नगरपरिषदपुरती मर्यादित राहणार नसून, सातारा जिल्ह्याच्या एकूणच राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
नगराध्यक्ष पद आरक्षित असले तरी नगरसेवक पदांसाठी मोठी चुरस...
मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी वार्डनिहाय मतदारसंख्या व आरक्षणाचे तपशील जाहीर झाले आहेत. नगराध्यक्ष पद आरक्षित असले तरी नगरसेवक पदांसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. एकूण अकरा वार्डांमध्ये बावीस जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी काही जागा महिलांसाठी तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहेत. या सर्व वार्डांमध्ये एकूण मतदारसंख्या २४ हजार ५७४ असून, त्यापैकी १२ हजार ७१२ पुरुष मतदार, १२ हजार ४५७ महिला मतदार आणि ५ इतर मतदारांचा समावेश आहे.
नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण....
या निवडणुकीत नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मलकापूरच्या राजकीय आखाड्यात या आरक्षणामुळे नवे राजकीय समीकरण आकार घेणार असल्याचे दिसत आहे.
वार्डनिहाय आरक्षण व मतदारसंख्या....
वार्ड क्रमांक १ मध्ये बी.सी.सी. (महिला) आणि सर्वसाधारण अशी दोन जागा असून पुरुष मतदार १,०९३, महिला मतदार १,०८५ आणि इतर १ आहेत.
वार्ड क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण असे आरक्षण असून पुरुष मतदार १,०६९, महिला मतदार १,०३२ आहेत.
वार्ड क्रमांक ३ मध्ये बी.सी.सी. आणि सर्वसाधारण (महिला) अशी आरक्षणे असून पुरुष मतदार १,२१५, महिला मतदार १,१७४ आणि इतर १ आहेत.
वार्ड क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण (महिला) अशा दोन जागा असून पुरुष मतदार १,२०२ आणि महिला मतदार १,२५२ आहेत.
वार्ड क्रमांक ५ मध्ये बी.सी.सी. (महिला) आणि सर्वसाधारण अशा जागा असून पुरुष मतदार १,३७६, महिला मतदार १,३८४ आणि इतर ३ आहेत.
वार्ड क्रमांक ६ मध्ये सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण अशा दोन जागांसाठी पुरुष मतदार १,४२८, महिला मतदार १,४२६ आणि इतर १ आहेत.
वार्ड क्रमांक ७ मध्ये बी.सी.सी. (महिला) आणि सर्वसाधारण अशा जागा असून पुरुष मतदार १,१०१, महिला मतदार १,१०५ आहेत.
वार्ड क्रमांक ८ मध्ये अनुसूचित जाती (महिला) आणि सर्वसाधारण अशा जागा असून पुरुष मतदार १,१६१, महिला मतदार १,०५३ आहेत.
वार्ड क्रमांक ९ मध्ये बी.सी.सी. आणि सर्वसाधारण (महिला) अशा दोन जागा असून पुरुष मतदार १,०९३ आणि महिला मतदार १,०७५ आहेत.
वार्ड क्रमांक १० मध्ये सर्वसाधारण आणि बी.सी.सी. अशी आरक्षणे असून पुरुष मतदार १,११३ आणि महिला मतदार ९७५ आहेत.
तर वार्ड क्रमांक ११ मध्ये सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण अशा दोन जागा असून पुरुष मतदार १,१८८ आणि महिला मतदार ९७५ आहेत.
महिलांचा राजकीय सहभाग वाढणार....
एकूणच पाहता मलकापूर नगरपरिषदेतील बहुतेक वार्डांमध्ये महिला आरक्षण असल्याने महिलांचा राजकीय सहभाग वाढण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण असलेले वार्ड क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि ११ असून, अनुसूचित जातीसाठी राखीव वार्ड क्रमांक ४ आणि ८ आहेत.
तर मागासवर्गीय प्रवर्ग (बी.सी.सी.) साठी राखीव वार्ड क्रमांक १, ३, ५, ७, ९ आणि १० ठरवण्यात आले आहेत.
नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी राखीव असल्याने या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो. विविध पक्षांचे स्थानिक नेते आता नव्या आरक्षण व्यवस्थेनुसार आपली रणनिती आखत आहेत.
#मलकापूरनिवडणूक #राष्ट्रवादीकाँग्रेस #अजितदादापवार #नितीनकाकापाटील #उदयसिंहपाटील #साताराराजकारण #कराडदक्षिण #ChangbhalaNews #MalkapurPolitics #NCPAjitPawarGroup #SataraElections2025 #KaradPolitics

0 टिप्पण्या