कराड , दि. १२ नोव्हेंबर २५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला सुरुवात झाली असून, आज बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अजय पावसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पावसकर यांनी कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या कडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत आहे. या कालावधीत रविवार वगळता अर्ज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ऑनलाईन, तर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत प्रत्यक्ष सादर करता येणार आहेत.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहिणी शिंदे आणि प्रशांत व्हटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निष्ठावंताचा पहिला उमेदवारी अर्ज....
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अजय पावसकर यांनी आपला अर्ज सादर केल्याने कराड नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून पहिला अर्ज दाखल झाल्याची नोंद झाली आहे. अजय पावसकर आणि त्यांचे बंधू विक्रम पावसकर त्यांनी भाजप पक्ष रुजवण्यासाठी गेल्या काही वर्षात कराड दक्षिण आणि उत्तर मध्ये मोठे कष्ट घेतले आहे. विक्रम पावस्कर हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. कराडच्या शिवजयंती उत्सवात या दोन बंधूंचा मोठा पुढाकार असतो. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून अजय पावसकर कराड परिसरामध्ये कार्यरत आहेत. विक्रम पावसकरांचे बंधू अजय यांचा भाजपने पहिला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकूणच पुढच्या प्रक्रियेमध्ये भाजपकडून निष्ठावंतांनाच अधिकाधिक उमेदवारीची संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.. प्रत्यक्षात पक्षनेतृत्व उमेदवारांच्या संदर्भात कोणते निर्णय घेते आणि कोणाला कोणत्या प्रभागातून उमेदवारीची संधी मिळते, हे लवकरच पाहायला मिळेल.
आगामी दिवसांत विविध पक्षांचे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढे येणार असून, २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा रंग दिवसेंदिवस चढताना दिसत आहे.
#KaradElection2025 #KaradNagarparishad #AjayPawasakar #BJP #KaradNews #SataraNews #ChangbhalaNews #MaharashtraPolitics #नगरपरिषदनिवडणूक #कराडनिवडणूक२०२५ #भाजपनिवडणूक #ताज्याबातम्या #KaradUpdates
हे ही वाचा : मलकापुरात राष्ट्रवादीने दंड थोपटले! अजितदादांच्या राष्ट्रवादीची नवीन रणनीती
0 टिप्पण्या