कराड, दि. १५ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना कराड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यानच शुक्रवारी रात्री शहरातील अशोक चौक परिसरात दोन गटात जोरदार राडा झाला. विटा, दगडफेक झाली. काठ्या आणि तलवारी नाचवल्या गेल्या. वाहनांची मोडतोड करण्यात आली. या तुंबळ हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड शहर पोलिसांकडून घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आला असून या घटनेची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड शहर नगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्ष आणि गटातटांच्याकडून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. कराड शहरातील राजकीय वातावरण नरम-गरम आहे. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी खाजगी बैठका सुरू आहेत. प्रत्येक पक्ष उमेदवारांची आणि मतदारांची जुळवा जुळवा करण्यामध्ये व्यस्त आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री शहरातील अशोक चौक, शिंदे गल्ली परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. तलवारी आणि काठ्या नाचवल्या गेल्या. विटा, दगडफेक झाली. वाहनांची मोडतोड करण्यात आली. या तुंबळ हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले. हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर हाणामारी करणारे युवक पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळली असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, या हाणामारी मागे राजकीय कारण होते की अन्य काही, याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडू नयेत , यासाठी कराड शहर पोलिसांना आता अधिक दक्ष राहावे लागणार आहे.
#KaradNews #KaradCrime #KaradElection2025 #KaradMunicipalElection #MaharashtraNews #ChangbhalaNews #BreakingNews #AshokChowk #KaradPolice #CrimeUpdate #SataraNews #PoliticalTension #KaradLive



0 टिप्पण्या