कराड, दि. २७ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीकडून संयुक्तपणे उद्या , शुक्रवारी, दि. २८ नोव्हेंबर रोजी शहरातील कन्याशाळा, मंगळवार पेठ, कराड या ठिकाणी सायंकाळी ५ वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेत राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेले, सत्ताधारी आणि विरोधक या भूमिकेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे तीन महत्त्वाचे नेते पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
शिंदे–शंभूराज–बाळासाहेब पाटील एकत्र...
या जाहीर सभेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व ‘लाडकी बहीण’ योजनेचे जनक ना. एकनाथ शिंदे, शिवसेना नेते व साताऱ्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई , आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
हे मार्गदर्शन करणार आहेत.
संयुक्त आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांचे शक्तीप्रदर्शन...
लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे संयुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्या तसेच यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीच्या सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेना जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीत या जाहीर सभेच्या निमित्ताने यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचे शक्तीप्रदर्शन होणार आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकत्र एकाच मंचावर येत असल्याने ते नेमके काय बोलणार? याबाबत उत्सुकता आहे. या सभेला शहर व परिसरातील नागरिकांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#KaradElection2025 #KaradNagarParishad #EknathShinde #ShambhurajDesai #BalasahebPatil #RajendrasinhYadav #YashwantAghadi #LokshahiAghadi #KaradPolitics #ChangbhalaNews
"माझं कराड - माझं व्हिजन" – राजेंद्रसिंह यादव यांनी मांडलेली भूमिका

0 टिप्पण्या