कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करणार ; कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
कराड प्रतिनिधी, दि. २९ | चांगभलं वृत्तसेवा
: कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा उत्तरार्ध गाजवत भाजपाने थेट राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा कराडमध्ये आयोजित केली आहे. रविवारी (दि. ३० नोव्हेंबर) दुपारी ठीक २ वाजता दत्त चौक येथे ही भव्य जाहीर सभा होणार असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तोफेचा गजर कराड-मलकापूरमध्ये घुमणार आहे.
निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच भाजपाने मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवत आपली ताकद दाखवून दिली आहे. राज्याच्या राजकारणातील प्रभावी व विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कराड दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्ते व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. कराड-मलकापूर भागातील प्रस्तावित विकासकामे, नव्या योजनांबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभेला भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, भाजपाचे राज्य परिषद सदस्य सत्यजितसिंह पाटणकर, प्रदेश संचालन समितीचे सदस्य रामकृष्ण वेताळ, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, कराडच्या माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, रोहिणी शिंदे, मलकापूरच्या माजी नगराध्यक्ष नीलम येडगे, कराड नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि मलकापूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनावले यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
या सभेच्या निमित्ताने भाजपाने कराड-मलकापूरमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. शहरातील व परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष सौ. सुषमा लोखंडे यांनी केले आहे.
#DevendraFadnavis #KaradRally #MalkapurElection #BJPKarad #MaharashtraPolitics #KaradNagarPalika #BJPShaktiPradarshan #FadnavisInKarad #AtulBhosale #LocalBodyElection2025

0 टिप्पण्या