🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

“कराड नगरपालिकेसाठी पक्ष ठरवेल त्यालाच तिकीट! मी कोणालाही शब्द दिलेला नाही – आ. डॉ. अतुल भोसले यांची स्पष्ट भूमिका”

 

कराड नगरपालिका निवडणुकीवर आ. डॉ. अतुल भोसले यांची प्रतिक्रिया – “तिकीट पक्ष ठरवेल त्यालाच मिळेल”
Photo - Changbhala-News

कराड | हैबत आडके
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष आणि आघाड्यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.‌ या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरांमधील दिग्गज माजी नगरसेवक आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक मातब्बरांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस समर्थक माजी नगरसेवक व त्यांच्याशी संबंधित इच्छुकांचा यामध्ये समावेश असल्याने कोणाला कोणत्या प्रभागात उमेदवारी मिळणार याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगू लागल्या आहेत.. काहींनी आपापल्या प्रभागातून लढण्याची तयारीही सुरू केली आहे... अशा इच्छुकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज माध्यमांशी बोलताना चांगलेच फटकारले आहे. 'तिकीट मलाच मिळाल्याची आवई उठवू नका , पक्ष ठरवेल त्यालाच तिकीट मिळेल, मी कोणालाही शब्द दिलेला नाही" असेही आ. डॉ. भोसले बजावले आहे.

दरम्यान, "भाजपला नगराध्यक्ष पद द्यायची तयारी असेल तरच महायुती मधील मित्र पक्षांना सोबत घेऊ. काहीही झालं तरी नगराध्यक्ष हा भाजपचाच राहील", असे सांगत आ. डॉ. अतुल भोसले यांनी नगराध्यक्ष पदाबाबत भाजप कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत नसल्याचा थेट इशाराच भाजप सोबत येऊ इच्छिणाऱ्या पक्ष आणि आघाड्यांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.

शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस व राष्ट्रवादीशी संबंधित काही माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये केलेल्या पक्षप्रवेशाचे आ. डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी बोलताना ठामपणे समर्थन केले. ते म्हणाले की, "भाजप हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे. विशाल पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक जणांना पक्षात यावे वाटते. आणि पक्षात येण्याची इच्छा कोणी स्वतःहून व्यक्त केली तर त्यांना आम्हाला पक्षात घेण्याशिवाय पर्याय नसतो. ‌भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला त्यांना पक्षात घ्यावेच लागते. तरी देखील सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न करू."

कराडला नगरसेवक पदाचे तिकीट कोणाला मिळणार याबाबत बोलताना आ. डॉ. अतुल भोसले म्हणाले की, "बऱ्याच प्रभागामधील तक्रारी माझ्याकडे येत आहेत की 'आमदारांनी आम्हाला तिकिटासाठी शब्द दिला आहे. तिकीट मलाच मिळाले आहे' असे काही जण सांगत आहेत. नगराध्यक्ष पदाला इच्छुक असलेले अनेक जण अशा पद्धतीने अपप्रचार करत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की तिकिटासाठी आम्ही कोणालाही शब्द दिलेला नाही. भारतीय जनता पार्टीची एक कार्यपद्धती आहे. पक्षाचे निरीक्षक येतात, इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतात. आणि इच्छुका मधील जे योग्य आहेत त्यांची निवड करण्याचे अधिकार भारतीय जनता पार्टीच्या शिखर नेतृत्वाला आहेत. आणि पार्टी ज्याला उमेदवारी देईल , त्याचे काम करायची माझी भूमिका राहणार आहे. त्यामुळे काही लोकं त्यांच्या प्रभागात करत असलेला असा हा प्रचार चुकीचा आहे. चार-चार.. पाच-पाच लोकं त्यांच्या-त्यांच्या वाॅर्डामध्ये फिरत आहेत आणि सांगत आहेत की 'तिकीट मलाच मिळाले आहे' तर ते चुकीचे आहे. पक्षातील कोणालाही शब्द दिलेला नाही. शब्द देण्याचा अधिकार कोणालाही नाही. पक्षाचे शिखर नेतृत्व आणि कोअर कमिटी जो उमेदवार निश्चित करेल त्याचे काम करायची लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका राहणार आहे. त्यामुळे असा अपप्रचार करणाऱ्यांना माझं सांगणं आहे की असा अपप्रचार थांबवा. तुम्ही पक्षासाठी काम करा मात्र फक्त उमेदवारीसाठी म्हणून काम करू नका. उमेदवारी ही पक्ष ठरवेल त्यालाच मिळेल."

कराड नगरपालिका निवडणुकीला महायुती होणार का ? या संदर्भात बोलताना आ. डॉ. अतुल भोसले यांनी "आपला तसा प्रयत्न सुरू" असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "कराडमध्ये नगरपालिका निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाता येतेय का हे पाहण्यासाठी मी महायुतीमधील शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि संबंधित आघाड्यांना एकत्र बसून चर्चा करण्यासाठी निमंत्रण देणार आहे. गावासाठी एकत्र बसून तोडगा काढता येतोय का असा माझा प्रयत्न आहे."

कराड नगराध्यक्ष पदावर भाजपचा दावा आहे, आणि तो कायम राहील, असा अप्रत्यक्ष महायुती मधील घटक पक्षांना इशारा देताना आ. डॉ. अतुल भोसले म्हणाले, निवडणूक ही महायुती म्हणून व्हावी. मात्र नगराध्यक्ष हा महायुती म्हणून भाजपचाच असावा. पाठीमागे २०१७ मध्येही लोकांनी भाजपच्या नगराध्यक्षाला निवडून दिले होते. त्यामुळे नगराध्यक्षपदावर भाजप ठाम आहे, महायुतीमधून भाजपचाच नगराध्यक्ष व्हावा आणि महायुती मधून मित्रपक्षांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आमचे मत आहे. पण ठीक आहे प्रत्येकाची ध्येयधोरणे जशी असतील तसा त्यांनी विचार जरूर करावा, पण लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर ठाम आहे की नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हा अधिकृत नगराध्यक्षपदासाठी उभा राहील."

दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केलेले वक्तव्य पाहता महायुती झाली तरी कराडच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महायुती म्हणून आ. डॉ. अतुल भोसले यांच्या निमंत्रणाला मित्र पक्षांचा किती प्रतिसाद मिळेल, चर्चेत कोणती भूमिका ठरेल, नगराध्यक्षपदावर कोणाचा क्लेम राहील, संतुलित जागा वाटप होईल का? चर्चेच्या बैठकीनंतर नेमके कोणते निर्णय जाहीर होतात, याची उत्सुकता कराडकरांना लागली आहे.


#KaradMunicipalElection #AtulBhosale #BJP #KaradPolitics #Mahayuti #KaradNews #ChangbhalaNews #KaradNagarPalika #PoliticalNews #MaharashtraPolitics #BJPKarad #AtulBhosaleStatement #KaradBreakingNews #SataraNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या