कराड , दि. १९ नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहर परिसरात सातत्याने शारीरविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत टोळीवर अखेर कडक कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील गणेश शिवाजी काटकर (वय २४) व त्याचा साथीदार प्रसाद उर्फ बाबू आनंद कुलकर्णी (वय २७), रा. मंगळवार पेठ, कराड या दोघांना सातारा पोलिसांनी तीन महिन्यांसाठी सातारा व सांगली जिल्ह्याबाहेर तडीपार केले आहे. या निर्णयामुळे कराडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दोघांवर खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवणे, मारामारी, दंगल, घरफोडी व चोरी असे अनेक गंभीर व दखलपात्र गुन्हे कराड शहर पोलिसांत दाखल आहेत. प्रतिबंधक कारवाई करूनही टोळीची गुन्हेगारी थांबण्याची कोणतीही चिन्हे न दिसल्याने कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाची चौकशी पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी पूर्ण केली. नागरिकांचा वाढता त्रास, गुन्ह्यांची मालिका व टोळीवर कायद्याचा धाक न उरणे या पार्श्वभूमीवर हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुनावणी घेऊन दोन्ही संशयितांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचा आदेश जारी केला.
दरम्यान, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका निकट आल्याने जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा कठोर उपाययोजना राबविणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तसेच पोलीस पथकातील प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सज्जन जगताप, आनंदा जाधव व सोनाली मोहीते यांनी आवश्यक पुरावे जमा करून कार्यवाही यशस्वी केली.
सतत दहशतीत जगणाऱ्या कराड शहरातील नागरिकांना या कडक कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
#KaradCrimeNews #KaradPolice #SataraPolice #TadiparAction #ChangbhalaNews #CrimeReport #KaradCity #SataraDistrict #SangliDistrict #SaraitGuneghar #PoliceAction #LawAndOrder #MaharashtraPolice #CrimeUpdate #KaradBreakingNews

0 टिप्पण्या