कराड बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय ; शेतीमालाच्या दर आणि विक्रीला चालना
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड येथील स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट हे आतापर्यंत फक्त संध्याकाळच्या सत्रात सुरू होते. मात्र शेतकरी बांधवांच्या सातत्यपूर्ण मागणीचा सकारात्मक विचार करून येत्या १ जानेवारीपासून हे मार्केट सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सभापती शंकरराव इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीला अधिक संधी मिळणार असून,भाववाढीसही हातभार लागणार आहे.
कराड भाजीपाला मार्केटमध्ये कराड तालुक्यासह इतर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला शेतीमाल विक्रीसाठी आणत असतात. याचबरोबर कोकण भागासह विविध ठिकाणांहून येणारे व्यापारी व खरेदीदार येथे शेतीमालाची खरेदी करतात. त्यामुळे या बाजारात नेहमीच चांगली स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र दिसून येते.
एकाच सत्रात बाजार भरल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना वेळेअभावी, वाहतूक अडचणीमुळे किंवा गर्दीमुळे आपला माल वेळेत विक्रीस लावता येत नव्हता. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या सोयीच्या वेळेत माल आणण्याची मुभा मिळणार आहे. परिणामी मालाची आवक अधिक वाढेल, दर्जेदार मालाला स्वतंत्र ओळख मिळेल आणि दरात स्थैर्य येण्यास मदत होणार आहे.
विशेषतः भाजीपाला,फळे यांसारख्या नाशवंत शेतीमालासाठी दोन सत्रांचा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार असून,शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. तसेच व्यापारी वर्गालाही खरेदीसाठी अधिक वेळ मिळणार असल्याने व्यवहारात पारदर्शकता आणि विश्वास वाढणार आहे.
येत्या १ जानेवारीपासून शेतकरी बांधवांनी आपला भाजीपाला व फळांचा शेतीमाल सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रांत बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट आवारात विक्रीसाठी आणावा,असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव इंगवले व उपसभापती नितीन ढापरे व संचालक मंडळाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय म्हणजे कराड बाजार समितीची शेतकरी हिताची स्पष्ट भूमिका असून, भविष्यातही अशाच उपयुक्त निर्णयांमुळे शेतकरी आणि बाजार व्यवस्थेतील समन्वय अधिक मजबूत होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradMarket
#BhajipalaMarket
#FarmerFriendlyDecision
#ShetiMal
#KaradAPMC
#ShetkariHakk
#AgricultureNews
#VegetableMarket
#ChangbhalaNews
#MaharashtraAgriculture



0 टिप्पण्या