कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी तेजस शेखर सोनवले यांनी विजय मिळवला आहे. १ जानेवारी २०२६ रोजी, म्हणजे नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी, मलकापूर नगरपरिषद कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी उपनगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक मनोहर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी नूतन नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्याकडे अधिकृत कार्यभार सोपवला. यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचे स्वागत केले. कार्यक्रमास नगरपरिषदेचे सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मलकापूर शहराच्या भविष्यातील विकासावर भर देत मार्गदर्शन केले.
ते म्हणाले , 'मलकापूर शहराचा विस्तार आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या अनुषंगाने शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. विशेषतः सध्याच्या पाणीपुरवठा योजनेचे सक्षमीकरण करण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू', अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नूतन नगराध्यक्ष तेजस सोनवले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'मलकापूर शहरातील नागरिकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाचा मान मिळणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही' असा विश्वास सोनवले यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, 'मलकापूरच्या विकासाचा नवा अध्याय आता सुरू झाला असून आमदार अतुलबाबा भोसले यांच्या संकल्पनेतून घडलेले शहर म्हणून मलकापूरची ओळख राज्यासह देशभर निर्माण होईल.'
कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्या हस्ते सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.
———————— ----------------------------
#मलकापूरनगरपरिषद #तेजससोनवले
#नगराध्यक्षपदभार #AtulBhosale
#स्थानिकराजकारण #नगरविकास
#MalkapurCity #ChangbhalaNews





0 टिप्पण्या