कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारत सरकारच्या केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आणि दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि, चे शासनमान्य सेवक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बँकांसाठी सोमवार दि. १६ फेब्रुवारी, २०२६ रोजी कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रम कराड येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७० सहकारी बँकांमधून २०० हुन अधिक सेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया (FIU-IND) ही भारतातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती संकलीत करणे, विश्लेषण आणि प्रसारित करणे तसेच मनी लाँड्रिंग आणि संबंधित गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक नेटवर्कद्वारे आर्थिक गुप्तचर माहिती संकलन आणि सामायिकरण समन्वयित आणि मजबूत करणारी प्रमुख राष्ट्रीय संस्था आहे.
या मेळाव्याचे उदघाटन फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे डेप्युटी डायरेक्टर रविराज कलशेट्टी, जी आनंद आणि सल्लागार राजन कान्नोज्जिया याच बरोबर कराड अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक व अर्बन कुटूंब प्रमुख सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष शशांक पालकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी फिन्टेलेक्ट, पुणे या जागतिक प्रशिक्षण संस्थेचे शिरीष पाठक आणि सौ. अर्पिता बेडेकर तसेच विशेष आमंत्रित म्हणून जळगाव जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकरी संजय नागमोती उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी केले आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. मागील पाच वर्षात कराड अर्बन बँकेने चौथ्यांदा असा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. २०२४ साली एफ.ए.टी.एफ. या जागतिक संस्थेकडून परस्पर मूल्यांकन अहवालामध्ये भारत देशाने मनी लॉड्रिंग आणि दहशतवादी कारवायासाठी होणाऱ्या वित्तपुरवठा रोखण्यासाठी उत्तम असे गुण मिळाल्याचे सांगितले आणि सर्व उपस्थितांनी वित्त मंत्रालय, भारत सरकार यांचे कौतुक केले.
फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे डेप्युटी डायरेक्टर जी आनंद यांनी सहकारी बँकांकडून मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत नागरी सहकारी बँकांनी करावयाचे अनुपालन याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे सल्लागार राजन कान्नोज्जिया यांनी बँकाच्या रिपोर्ट फायलिंग मधील त्रुटी आणि त्याचे निरसन करण्याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली.
फिन्टेलेक्ट, पुणे या प्रशिक्षण संस्थेच्या सौ. अर्पिता बेडेकर यांनी आर्थिक गुन्हेगारीचे बदलते स्वरूप कसे आहे आणि त्यामध्ये बँकांनी घ्यावयाची विशेष काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. कराड अर्बन बँकेचे उपमहाव्यवस्थापक सीएस. अमित रेठरेकर यांनी मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत बँकांनी जे विविध रिपोर्ट ऑनलाईन स्वरुपात फाईल केले जातात त्यामध्ये येणाऱ्या अडचणी विशद केल्या. आणि काही बाबींसाठी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने याबाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती केली.
या मेळाव्यात विशेषकरून फिननेट २.० तांत्रिक गोष्टींच्या निवारणासाठी खास फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे डेप्युटी डायरेक्टर रविराज कलशेट्टी ज्यांच्याकडे या सॉफ्टवेअरची जबाबदारी आहे यांनी रिपोर्टीग बाबत प्रत्यक्ष उदाहरण दाखल माहिती दिली. आणि प्रलंबित विषयांचे लवकरच निरसन होईल तसेच फिननेट २.० पोर्टल मधील वेग सुधारून तो वापरकर्त्यांना अधिक सुव्यवस्थितपणे वापरता येईल यादृष्टाने प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
या प्रशिक्षण मेळाव्यास उपस्थित ५ जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या प्रतिनिधी यांना आपल्या शंकाचे उत्तर प्रत्यक्ष फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या पदाधिकारी यांनी मराठीत दिल्यामुळे समाधान व्यक्त केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कराड अर्बन बँकेचे के. वाय.सी विभागाचे व्यवस्थापक विकास खबाले यांनी केले. उपमहाव्यवस्थापक वैभव गोसावी यांनी कराड अर्बन बँकेतर्फे असे चर्चासत्र वारंवार घेतले जाईल जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षा जोपासली जाईल असे नमूद करून सर्वांचे आभार मानले. हा मेळावा बहुतांशी मराठी भाषेत असल्यामुळे उपस्थित नागरी सहकारी बँकांच्या सेवकांना आपले कर्तव्य बजावताना नक्की काय काळजी घ्यावयाची ते कळाले.

0 टिप्पण्या