कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहरातील बुधवारपेठ परिसरात बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या दोन इसमांवर कराड पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कडक कारवाई केली जात आहे.
याच अनुषंगाने दि. १६ मार्च २०२६ रोजी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, बुधवारपेठ परिसरातील एका इमारतीत दोन इसम गांजा विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे तात्काळ सापळा रचण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने छापा टाकला असता, सोन्या उर्फ शुभम दिलीप पवार (रा. बुधवारपेठ) व जगन्नाथ महिपती भोसले (रा. बुधवारपेठ, कराड) यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईदरम्यान आरोपींच्या कब्जातून २ किलो ३३६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ५८,७०० रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा कराड शहर व परिसरात विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात अंमली औषधीद्रव्ये व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम तसेच पोलीस कर्मचारी संताजी जाधव, असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, मयूर देशमुख, अनिकेत पवार व दिग्विजय सांडगे यांनी केली.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे कौतुक केले आहे.



0 टिप्पण्या